आंबेवाडी ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा महाघोटाळा?

तेरणा काठ वृत्तसेवा –धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीचा तसेच करवसुली रकमांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत असून ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबत सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक कामांची एम.बी. पुस्तिका, अंदाजपत्रके, बिले आणि प्रत्यक्ष कामाची स्थिती यांमध्ये मोठे अंतर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही बिले प्रत्यक्ष काम न करता तयार करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, चौदाव्या वित्त आयोगातील कामे दलित वस्तीत करणे बंधनकारक असतानाही त्या वस्तीत एकही काम न केल्याने सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना तडा गेला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
करवसुली निधीतही अनेक गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप पुढे आले आहेत. अनेक व्हाउचर एका व्यक्तीच्या नावावर असून त्यावर भिन्न स्वाक्षऱ्या आढळल्याचे, तसेच काही व्यवहार संशयास्पद स्वरूपाचे असल्याचे ग्रामस्थांनी सादर केलेल्या कागदपत्रांतून दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे काही थेट आणि कडक प्रश्न उपस्थित केले आहेत. खर्चाचा तपशील, कामांचे प्रत्यक्ष निरीक्षण, सादर कागदपत्रांतील विसंगती, आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांची भूमिका याबाबत प्रशासनाने स्पष्ट उत्तर द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, गावविकास निधीचा अपहार लपवण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा संशय असून या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक गोष्टी उघडकीस येऊ शकतात.
ग्रामस्थांनी प्रशासनास मागणी केली आहे की —
• या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी
• चौकशी 30 दिवसांच्या आत पूर्ण करावी
• दोषी आढळणाऱ्या संबंधित पदाधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास मौजे आंबेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील.
या निवेदनावर आंबेवाडी गावातील 50 ते 55 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.



