श्री दत्त मंदिर संस्थान, रुईभर यांच्या वतीने.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांचा सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा — धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील श्री दत्त मंदिर संस्थान येथे दत्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांच्या गर्दीत नामस्मरण, पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने निनादला.
या पवित्र प्रसंगी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांनी कुटुंबासह मंदिराला भेट देऊन श्री दत्तगुरू महाराज यांच्या मूर्तीचे तसेच श्री संत आप्पा बाबा महाराज यांचे दर्शन घेतले. मंदिरातील शांत, पवित्र वातावरणात त्यांनी कुटुंबासह विशेष पूजा केली.
डॉ. चौहान यांच्या आगमनानिमित्त श्री दत्त मंदिर संस्थान, रुईभर यांच्या वतीने त्यांचा आणि त्यांच्या पत्नींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आकाश चव्हाण, माजी उपसरपंच भगीरथ लोमटे, तसेच बाळासाहेब जावळे यांच्या हस्ते डॉ. चौहान व त्यांच्या कुटुंबीयांचा मानपत्र, पुष्पहार आणि शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. चौहान यांच्या सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची प्रशंसा करत त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमामुळे दत्त जयंती उत्सवात अधिक उत्साह आणि भक्तिभावाची उधळण पाहायला मिळाली.



