१ एप्रिल २०१९ पूर्वीची वाहने एच.एस.आर.पी बसविण्यासाठी मुदतवाढ

तेरणा काठ वृत्तसेवा — केंद्रीय मोटार वाहन नियम,१९८९ च्या कलम ५० नुसार सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.१३०२९/१९८५ (एम.सी.मेहता विरुद्ध केंद्र शासन) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.याबाबतचा आढावा रस्ते व महामार्ग मंत्रालय,नवी दिल्ली यांच्याकडून घेतला जात आहे.
तसेच,रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या G.S.R ११६२(E) दि.४/१२/२०१८ व एस.ओ ६०५२ दि.६ डिसेंबर २०१८ नुसार ६ डिसेंबर २०१८ पासून नोंदणी होणाऱ्या सर्व नवीन वाहनांवर HSRP बसविणे बंधनकारक आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना कळविण्यात येते की,१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ अशी देण्यात आलेली आहे.वाहनधारकांनी मुदत संपण्यापूर्वी स्वतःच्या वाहनांवर HSRP अनिवार्यपणे बसवून घ्यावी,असे आवाहन करण्यात येत आहे.
३१ डिसेंबर २०२५ नंतर HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा,१९८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.तथापि,३१ डिसेंबर २०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी घेतलेली अपॉइंटमेंट असल्यास अशा वाहनांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी कळविले आहे.



