समाजहितासाठी झिजलेले आयुष्य म्हणजेच पन्नालाल सुराणा–ह.भ.प.महादेव महाराज आडसुळ
समाजवादी नेता पन्नालाल सुराणा यांच्यासाठी श्रद्धांजली सभेत भावना व्यक्त

तेरणा काठ वृत्तसेवा – आपल्या समाजात निस्वार्थपणे काम करणारे, लोभ-मत्सरापासून दूर राहून फक्त माणसासाठी जगणारे असे दुर्मिळ रत्न आयुष्यभर समाजप्रकाश पसरवत राहतात.पन्नालाल सुराणा हे असेच तेजस्वी समाजवादी रत्न होते. त्यांनी जिवंतपणी मानवतेची सेवा केली आणि मृत्यूनंतरही देहदान करून समाजाला उजेड देण्याचा कार्यधर्म पूर्ण केला.अशा महामानवाला माझा कोट्यवधी कळंबकरांच्या वतीने मन:पूर्वक नमस्कार,” अशा भावना ह.भ.प. महादेव आडसुळ महाराज यांनी व्यक्त केल्या.
प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा,कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने साक्षी कोचिंग क्लासेस येथे गुरुवार,दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ समाजवादी नेता पन्नालाल सुराणा यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली. ह.भ.प. महादेव आडसुळ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा अत्यंत भावुक वातावरणात पार पडली.
महाराजांनी आपल्या भाषणात सुराणा यांच्या कार्याचा मागोवा घेत समाजहितासाठी त्यांची भूमिका आवर्जून अधोरेखित केली. ते म्हणाले,
“आजच्या काळात पदासाठी धडपडणारे अनेक असतील; पण पदासाठी नव्हे तर माणसासाठी जगणारे फार कमी असतात. पन्नालाल सुराणा यांनी कधीही प्रसिद्धीचा मोह ठेवला नाही. त्यांच्या घामाची प्रत्येक थेंब समाजकार्यात मिसळलेला होता. गरीब-दुबळ्या, पीडित-वंचितांसाठी ते सदैव धावून जात. समाजवादी विचार, तत्त्वनिष्ठता आणि माणसावरील प्रेम म्हणजेच पन्नालाल सुराणा.
सभेत प्राचार्य जगदीश गवळी, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, माजी नगरसेवक सुनिल गायकवाड,साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ.गिरीश कुलकर्णी,तालुकाध्यक्ष सोपान पवार,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,रविंद्र चव्हाण,पत्रकार अच्युत पौळ आदींनी पन्नालाल सुराणा यांच्या आठवणी जागवत,त्यांचे समाजातील योगदान व तत्त्वनिष्ठ कार्य अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी उत्तमरीत्या पार पाडले.प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी सुराणा यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानाचा वेध घेतला.संस्थेचे सचिव अविनाश घोडके यांनी सर्वांचे आभार मानत शोकसभेचा समारोप केला.



