श्री दत्त जयंती उत्सवाला मलकापूरात भाविकांची मांदियाळी

तेरणा काठ वृत्तसेवा — भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान, मलकापूर येथे दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दत्त जयंती निमित्त दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावल्याने मंदिर परिसरात दत्तगुरुच्या जयघोषाने मलकापूर नगरी दुमदुमली
२८ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अखंड सप्ताहाचा समारोप ह.भ.प. नाना महाराज कदम यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. कीर्तनानंतर महाआरतीचा सोहळा पार पडला. श्री दत्त जन्मानिमित्त पाळणा गायनासाठी असंख्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भाविकांनी श्री दत्तांच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करत दर्शनाचा लाभ घेतला. सात दिवस चाललेला सप्ताह, सिद्ध सुभाष बप्पा ग्रंथ पारायण सोहळा आणि दत्तजयंती महोत्सव ह.भ.प. एकनाथ महाराज लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.शेवटी महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर सांगता झाली.



