ताज्या घडामोडी

धुंदीत नव्हे तर शुद्धीत नव्या वर्षाचं स्वागत::: येडाई व्यसनमुक्ती केंद्राचा अनोखा उपक्रम 

तेरणा काठ वृत्तसेवा — येडाई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, येरमाळा येथे ३१ डिसेंबर २०२५ रोजी व्यसनमुक्ती गुणगौरव पुरस्कार 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून व्यसनमुक्त जीवन जगणाऱ्या परिवर्तनवादी रुग्णमित्रांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बिराजदार, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे, डॉ. पल्लवी तांबारे, सुमन तांबारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या गुणगौरव सोहळ्यानिमित्त केंद्रामध्ये दिवसभर विविध कलागुणांचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. यामध्ये गायन, नृत्य स्पर्धा, एकांकिका, नाटक व विविध खेळ आयोजित करण्यात आले. यासोबतच येडाई व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेऊन गेलेले व ३, ५, ७ आणि १० वर्षे व्यसनमुक्त जीवन जगणारे परिवर्तनवादी रुग्णमित्र यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पवार म्हणाले,
“फक्त स्वतः व्यसन सोडणे पुरेसे नाही, तर आपल्या समाजातील, गावातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील लोकांनाही व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त करा. त्यांना योग्य मार्गदर्शन करा, हीच खरी व्यसनमुक्तीची पावती आहे.”
येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव यांनी परिवर्तनवादी रुग्णमित्रांना संदेश देताना सांगितले की,
“आपण केलेल्या कष्टांचे योग्य फळ कुटुंबाला व समाजाला द्यायचे असेल तर व्यसनमुक्त झालेच पाहिजे.”
तसेच येडाई व्यसनमुक्ती केंद्रात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करून डॉ. संदीप तांबारे, डॉ. पल्लवी तांबारे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
डॉ. बिराजदार यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“व्यसनामुळे शरीराची जी दुर्दशा होते, ती टाळायची असेल तर आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याची हीच योग्य वेळ आहे. याचा फायदा केवळ स्वतःलाच नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही होतो.”
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संदीप तांबारे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले,
“व्यसनमुक्तीचा लढा सोपा नाही; मात्र या परिवर्तनवादी मित्रांकडूनच आम्हाला प्रेरणा मिळते. हा लढा आम्ही कायम लढत राहू. व्यसनमुक्त भारत – सशक्त भारत हेच आमचे ध्येय आहे.”
यावेळी त्यांनी ‘नो व्हिस्की, नो बियर – हॅपी न्यू इयर, दारू सोडा दूध प्या’ असा प्रभावी संदेश दिला.
या यशस्वी कार्यक्रमासाठी येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक गणेश परदेशी, तसेच बापूराव हुलुळे, संजय कांबळे, ऋषिकेश लोभे, सुदर्शन तामाने, राजकुमार मुंडे, समीर फरताडे, प्रियंका शिंदे, कल्पना कोठावळे, कविता तांबारे, कानिफनाथ डाखोरे, भारत सातपुते यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण परिसरात “नो व्हिस्की, नो बियर” या घोषवाक्याने दणाणून सोडत, व्यसनमुक्त नववर्षाचा संकल्प उपस्थितांनी केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.